कुपवाडमध्ये स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सुदैवाने मोठी रोकड बचावली 

कुपवाड | प्रतिनिधी १० एप्रिल २०२६ : येथील आर. पी. पाटील चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुदैवाने मशीनमधील रोकड सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.पोलीस

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाड येथील आर. पी. पाटील चौकात स्टेट बँकेचे (T1BF000471082) एटीएम केंद्र आहे. ९ एप्रिलच्या सायंकाळी ६:२० ते १० एप्रिलच्या सकाळी ६:३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने एटीएम केंद्रात प्रवेश केला. चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने एटीएम मशीनची तोडफोड करून ते फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मशीनचे नुकसान झाले असले तरी, चोरट्याला रोकड लंपास करण्यात यश आले नाही. या प्रकरणी भिकाजी संभाजी लिमकर (वय ४५, रा. उचगाव, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. लिमकर हे ‘सी एम एस इन्फो प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असून, ही कंपनी बँकांच्या एटीएम देखभालीचे काम पाहते. त्यांच्या फिर्यादीवरून कुपवाड एम.आय.डी.सी. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाभाडे  या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button