विटा: किरकोळ वादातून संसार उद्ध्वस्त; पतीने लोखंडी रॉडने वार करून पत्नीचा केला खून 

विटा  (प्रतिनिधी)१४ एप्रिल २०२४: विटा शहरात एका संतापजनक घटनेत पतीने आपल्या अवघ्या २३ वर्षीय पत्नीचा लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेनंतर संशयित पती फरार झाला आहे. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे.पोलिसांनी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अविनाश तुकाराम लोटके आणि काजल यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगाही आहे. सर्व काही सुरळीत सुरू असताना सोमवारी रात्री दोघेही अष्टमीच्या यात्रेला गेले होते. यात्रेवरून परतल्यानंतर त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. मंगळवारी पहाटे अविनाशने आपल्या मुलाला घेऊन मित्र रोहित कोरडे याच्याकडे गाठले. “काजल बाहेर गेली आहे,” असे सांगून त्याने मुलाला मित्राकडे सोडले आणि तो तिथून निघून गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी अविनाश परत न आल्याने रोहितला संशय आला. तो अविनाशच्या घरी गेला असता, घराला बाहेरून कडी असल्याचे त्याला दिसले आणि आत जमिनीवर रक्ताचे डाग आढळले. रोहितने तात्काळ पोलिसांना पाचारण केले.

पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता, काजल रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने गंभीर वार करण्यात आले होते, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. संशयित आरोपी पती अविनाश लोटके याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने आणि वडील फरार असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विटा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button