कुपवाडमध्ये ‘जय भीम’चा जयघोष; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 कुपवाड(प्रतिनिधी) १४ एप्रिल २०२६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कुपवाड शहर आणि परिसरात अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाने न्हाऊन निघालेल्या कुपवाड शहरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. शहरातील मुख्य सोसायटी चौकात उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, व्यापारी संघटनेचे रमेश जाधव, बामणोली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अमोल हांडे यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास मानवंदना दिली. जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी दुचाकी रॅल्या काढण्यात आल्या होत्या. तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी कुपवाड परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी वाजवली जाणारी भीमगीते आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या गीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले होते.सायंकाळी

शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्सवाच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये आणि शांतता राखली जावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button