
सांगली | प्रतिनिधी, ता.१ एप्रिल २०२६ : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा सुधारित आणि सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प आज झालेल्या तहकूब महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा अंतर्भाव करून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यावर अंतिम मोहोर उमटवण्यात आली आहे.
२७ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पाच्या सखोल अभ्यासासाठी तहकूब करण्यात आलेली सभा आज पुन्हा सुरू झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी शहराच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी मूलभूत गरजा, प्रलंबित विकासकामे आणि निधीच्या समन्यायी वाटपाबाबत महत्त्वाच्या सूचना मांडल्या, ज्यांचा समावेश अर्थसंकल्पात करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
विकासाचे मुख्य मुद्देमंजूर
करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात शहराच्या भविष्यासाठी खालील बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे:पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी भरीव तरतूद.
अमृत २.० योजना: या महत्त्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पाणीपुरवठा अधिक सक्षम करणे.
उद्यानांचे सुशोभीकरण: शहरातील मोकळ्या जागा आणि उद्यानांचा कायापालट करण्यासाठी विशेष निधी.
अर्थसंकल्पीय सभेस उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, सभागृह नेते संदीप आवटी यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, महापालिका सचिव, सर्व विभागांचे उपायुक्त आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
“आज मंजूर झालेला अर्थसंकल्प हा सांगली, मिरज आणि कुपवाड शहराच्या भविष्याचा विकास आराखडा आहे. सर्व सदस्यांच्या विधायक सूचनांचा आदर राखून आम्ही हा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहराचा कायापालट निश्चित होईल.”— धीरज सूर्यवंशी, महापौर
या मंजुरीमुळे आता महापालिका प्रशासनाला नवीन विकासकामांच्या निविदा काढणे आणि प्रलंबित कामे पूर्ण करणे सोपे जाणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.