सावधान! सांगलीत उन्हाचा कडाका वाढला; मनपाकडून ‘उष्माघात प्रतिबंधक’ नियमावली जाहीर

सांगली (प्रतिनिधी), ता.३१ : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने तातडीची नियमावली प्रसिद्ध केली आहे. महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

🔺उष्माघाताची लक्षणे कशी ओळखाल?

उन्हाचा त्रास झाल्यास शरीर निर्जलीकरण (Dehydration) कडे झुकते.

🔺 खालील लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा:

🔺प्रौढ व्यक्तींसाठी : तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा मळमळणे. प्रचंड घाम येणे किंवा स्नायू आखडणे. हृदयाचे ठोके वेगाने वाढणे.

🔺लहान मुलांसाठी : सतत चिडचीड करणे आणि खाण्यापिण्यास नकार देणे. लघवीचे प्रमाण कमी होणे आणि डोळे शुष्क होणे. त्वचा आणि ओठ कोरडे पडणे.

✅ काय करावे? (सुरक्षेचे उपाय)

जलसंजीवनीचा वापर: तहान नसली तरीही वारंवार पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, लस्सी आणि ओआरएस (ORS) यांचा जास्तीत जास्त वापर करा.

🔺पेहराव: बाहेर पडताना पांढरे, फिकट रंगाचे आणि सैल सुती कपडे वापरा. डोक्यावर टोपी, छत्री किंवा रुमाल ठेवा.

🔺वेळेचे नियोजन: कष्टाची कामे सकाळी १० च्या आत किंवा सायंकाळी ५ नंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

🔺 प्रवासात खबरदारी: स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा. वाहने पार्क करताना काचा थोड्या उघड्या ठेवा जेणेकरून हवा खेळती राहील.

❌ काय टाळावे? (धोक्याचे इशारे)

🔺दुपारचे ऊन: दुपारी १२ ते ३ या वेळेत प्रखर उन्हात फिरणे किंवा कष्टाची कामे करणे टाळा.

🔺हे पदार्थ टाळा: चहा, कॉफी, मद्य आणि जास्त साखरेची शीतपेये (Cold Drinks) पिणे टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.

🔺अनवाणी चालणे: तापलेल्या रस्त्यावर किंवा सिमेंटच्या पृष्ठभागावर अनवाणी चालणे टाळा.

🔺बंद वाहने: पार्क केलेल्या बंद गाडीत लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना कधीही एकटे सोडू नका.

🚑 आपत्कालीन परिस्थितीत काय करावे?

जर एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाला, तर त्वरित खालील कृती करा: रुग्णाला सावलीत किंवा थंड ठिकाणी नेऊन पंख्याखाली झोपवावे. अंगावरील घट्ट कपडे सैल करावेत. रुग्णाला शुद्धीवर असल्यास थंड पाणी पिण्यास द्यावे. परिस्थिती गंभीर असल्यास त्वरित नजीकच्या मनपा आरोग्य केंद्र, आयुष्यमान आरोग्य मंदिर किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करावे.

“उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी वरील नियमांचे काटेकोर पालन करावे. मनपाचे सर्व दवाखाने उष्माघात कक्षासह सज्ज आहेत.”— डॉ. सुचेता पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली मनपा.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button