अमली पदार्थविरोधी मोहिमेत जबाबदारीने व गांभीर्याने कार्यवाही करा: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली जिल्हा ‘एनकॉर्ड’ (NCORD) समितीच्या बैठकीत आढावा; ‘अमली पदार्थमुक्त सांगली’साठी व्यापक मोहिमेचे निर्देश

सांगली, ता. ३० : “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम अंमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापर रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने काम करावे. भावी पिढीचे या व्यसनांपासून संरक्षण करणे ही आपली सर्वांची प्राथमिकता आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या (NCORD) बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांची प्रमुख उपस्थिती होती.    

जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी सूचना दिली की, प्रत्येक विभागाने केलेल्या कार्यवाहीचा सचित्र आणि सविस्तर अहवाल सादर करावा. या अभियानात केवळ पोलीसच नव्हे, तर तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनाही सक्रियपणे सहभागी करून घ्यावे. ग्रामसभांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला.

विविध विभागांना दिलेले मुख्य निर्देश:

कृषी विभाग:शेतातील पिकांची आणि क्षेत्राची नियमित तपासणी करावी.

एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्र: सुरू असलेले आणि बंद असलेले कारखाने यांची कसून तपासणी करावी.

शिक्षण विभाग: जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शाळा-महाविद्यालयांमध्ये तपासणी मोहीम राबवावी आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी.

परिवहन विभाग: रेल्वे डबे आणि सार्वजनिक वाहनांवर अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारे स्टिकर्स लावण्यात यावेत.

प्रसिद्धी: अमली पदार्थ आढळल्यास किंवा त्यावर कारवाई झाल्यास त्याबाबत व्यापक प्रसिद्धी देऊन जनतेला सतर्क करावे.

या महत्त्वपूर्ण बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजकिरण साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची आणि मोहिमेच्या नियोजनाची माहिती बैठकीत सादर केली. जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button