आरग लक्ष्मीवाडी रस्त्याचे दोन महिन्यातच वाटोळे झाले असून पालकमंत्र्यांनी दिलेल्या ५ कोटीचा चुराडा ; पालकमंत्र्याच्या निधीची ठेकेदाराकडून लूट ; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका.

मिरज पूर्व भागातून कर्नाटकला जोडणाऱ्या राज्य सीमेवरील आरग ते लक्ष्मीवाडी रस्ता दोन महिन्यातच पूर्णतःउखडला आहे. सदर रस्त्याचे काम निष्कृष्ट झाले असून संबंधित ठेकेदाराला काळी यादी टाकण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष परसराम बनसोडे यांच्यासह ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा आरग ते लक्ष्मीवाडी हा रस्ता पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. या रस्त्याच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. दोन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कामात निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने रस्ता पूर्णता उखडला आहे.
एकूण चार किमी लांबी असणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे. नव्याने डांबरी करण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी उचकटून पडली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावर मंगसुळी खंडोबा आणि महालक्ष्मी देवस्थान लक्ष्मीवाडी येथे जाण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. परंतु रस्त्याच्या निष्कृष्ट कामामुळे ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या निधीचा ठेकेदाराने लूट केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला . या ठेकेदाराची सखोल चौकशी करून ठेकेदाराला कायमस्वरूपी काळा यादीत टाका अन्यथा आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाने दिला आहे.
थर्ड पार्टी ऑडिट द्वारे आणि गुण नियंत्रण कक्षा कडून रस्त्याच्या दर्जा तपासण्याची मागणी केली बांधकाम विभागाकडे केले आहे. आता, बांधकाम विभाग ठेकेदारावर काय कारवाई करणार…? रस्त्याचे काम कशाप्रकारे होणार….? याकडे लक्ष लागून राहिले आहे.