
सांगली:आज भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना दिव्यांगत्व आलेल्या तासगाव तालुक्यातील बेंद्री येथील हवालदार प्रशांत वसंत पाटील यांना त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ताम्रपट व 20 लाख रूपये सानुग्रह अनुदान देवून सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली शाळेतील 9 वर्षाच्या इयत्ता 5 वी मधील मुलगी कु. वल्लभी शेंडगे हिने गार्डनमधील अनोख्या झोपाळ्याचे केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील 16 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या अनुक्रमे मिरज उप विभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, विटा उप विभागीय पोलीस अधिकारी विपूल पाटील, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस हवालदार सागर लवटे, पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस फौजदार महेश जाधव व शरद माने, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र पाटील, चालक पोलीस हवालदार अनिल सुर्यवशी व संजय माने यांच्याही पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यासोबत महसुल दिनानिमित्त महसूल विभागातील, विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पूजा पाटील, लघु टंकलेखक वहिदा तांबोळी-मणेर, अव्वल कारकून विनायक यादव यांचा सत्कारही पालकमंत्री यांच्याकडून करण्यात आला.