
मिरज : मिरज तालुका वयोश्री योजनेपासून वंचित;
राष्ट्रवादीचा आरोप अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी
राज्यातील ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. मात्र, समाजकल्याण विभागाच्या दुर्लक्षामुळे ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी केला.
महादेव दबडे म्हणाले, मतदारसंघात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत काम करत असताना मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याचे निदर्शनास आले. याला प्रशासनाचे उदासीन धोरण जबाबदार आहे. योजनेच्या तालुकास्तरीय समितीकडून दि. ५ ऑगस्ट रोजी ग्रामसेवकांना पत्र देण्यात आले आहे.
दिनांक ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. योजनेची माहिती जनतेपर्यंत न पोहोचवता या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत केवळ दोन दिवस ठेवण्यात आली आहे. यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार स्पष्ट होत आहे. योजनेला मुदतवाढ देण्याची मागणीही दबडे यांनी केली आहे.
एका गावात दिडशे अर्ज
महादेव दबडे म्हणाले की, वड्डी येथे आम्ही या योजनेसाठी शिबीर घेतले. यामध्ये गावातील सुमारे १५० वयोवृद्ध नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला. एका गावात एवढे असतील तर मिरज तालुक्यातील सर्व गावांमध्ये किती लाभार्थी असू शकतील, याचा अंदाज आपण बांधू शकतो. मात्र प्रशासनाने ही योजना या गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
