मिरजेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मोठा दणका; ३ लाखांचा गांजा जप्त, दोन आरोपींना बेड्या

सांगली (दि. ०३ फेब्रुवारी २०२६): मिरज शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. म्हैशाळ रोड परिसरातील उड्डाणपुलाजवळ सापळा रचून पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने म्हैशाळ रोडवरील उड्डाणपुलाच्या परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे ७ किलो १७५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारभावाप्रमाणे किंमत ३ लाख १५ हजार २५० रुपये आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. असा एकूण ४ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे  सोहेल लालुखान पठाण (वय २०) २. हुसेन बादशाहा सय्यद (वय २७) असे आहेत. दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर  कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. मिरज आणि सांगली परिसरात अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत असून, यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button