
सांगली, (प्रतिनिधी) ता.३ : सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या नियोजित विकासाला गती देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी कंबर कसली आहे. नगररचना आणि उद्यान विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरांमधील प्रमुख रस्ते विकसित करणे, भूसंपादन प्रक्रिया राबवणे आणि नागरी सुविधांच्या विस्तारासाठी ‘रोलिंग प्लॅन’ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी आयुक्तांनी खालील महत्त्वाच्या रस्त्यांच्या भूसंपादनाचे निर्देश दिले आहेत.
सांगली: आलदर चौक ते धामणी शिव आणि विजयनगर चौक ते कुंभार मळा रस्ता.
मिरज: १०० फुटी डी.पी. रोड (मिरज-पंधपूर रोड ते म्हैशाळ उड्डाणपूल).
पडताळणी: विजयनगर-कुंभार मळा रस्त्यासाठी कुपवाड हद्दीतील ११५ बाधित मिळकतींच्या मालकी हक्काची तातडीने पडताळणी होणार आहे.
🔨 अनधिकृत बांधकामांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी आयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. आता प्रत्येक अभियंत्याला दररोज किमान एक तास क्षेत्रिय फिरती करणे बंधनकारक असून, दररोज किमान १० नोटिसा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
🌳 प्रत्येक वॉर्डात दोन नवीन उद्याने
शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आयुक्तांनी ‘हरित क्रांती’चा नारा दिला आहे. नवीन उद्याने: प्रत्येक वॉर्डमध्ये दोन नवीन उद्याने विकसित केली जाणार आहेत. चिल्ड्रन पार्क्स: लहान मुलांसाठी नवीन चिल्ड्रन पार्क्सची जागा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अस्तित्वातील सर्व उद्यानांचे ऑडिट करून तिथे नवीन जिम इक्विपमेंट, खेळणी आणि वॉकिंग ट्रॅकवर कर्ब स्टोन बसवले जाणार आहेत. पुष्पराज चौक ते राजवाडा चौक आणि लव्हली सर्कल ते रेल्वे पुलापर्यंतच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच, ब्लू लाईन (पूर रेषा) आणि रेल्वे प्रशासनाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर समन्वय बैठका घेऊन तोडगा काढला जाणार आहे.
“शहराचा विकास आराखडा कागदावर न राहता तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे. भूसंपादन आणि रस्ते विकासाच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल.”
— श्री. सत्यम गांधी आयुक्त