
सांगली , ता.३ : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत शिस्त आणि पारदर्शकता राखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी आज प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारी कागदपत्रांची लपवाछपवी करणे आणि नागरी तक्रारींकडे दुर्लक्ष करणे अशा गंभीर कारणांवरून एका कर्मचाऱ्याला सेवेतून थेट कार्यमुक्त करण्यात आले असून, एका मुकादमावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
१. कागदपत्रांची लपवाछपवी केल्याबद्दल वाहनचालकाची हकालपट्टी
क्षेत्रीय कार्यालय ३ च्या आरोग्य विभागाकडील मानधनावरील वाहनचालक श्री. सुमित सुभाष कांबळे यांना सेवेतून कार्यमुक्त (Dismissed) करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉग व्हॅनमधील हजेरी पत्रक, लॉग बुक आणि डिझेल इंडीड अशी महत्त्वाची कागदपत्रे गायब केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठांनी विचारणा केली असता माहिती न देणे आणि पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आल्यावर ‘कागदपत्रे गाडी शेजारीच पडली आहेत’ असे सांगून दिशाभूल करणे, हा गंभीर विश्वासभंग आणि शिस्तभंग असल्याचे स्पष्ट झाल्याने आयुक्तांनी ही कठोर कारवाई केली.
२. नागरी तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुकादमास दंड
‘नागरी संवाद दिना’मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल न घेतल्याबद्दल क्षेत्रीय कार्यालय क्र. १, वॉर्ड क्र. १२ च्या मुकादमावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद न देणे आणि कर्तव्यात हलगर्जीपणा करणे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून, संबंधितांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.
आयुक्तांचा सज्जड इशारा
या कारवाईनंतर बोलताना आयुक्त सत्यम गांधी म्हणाले की, “महानगरपालिकेच्या सेवेत असताना प्रामाणिकपणा आणि शिस्त ही सर्वोच्च आहे. प्रशासनाची दिशाभूल करणे, सरकारी कागदपत्रांचे नुकसान करणे आणि नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुक्त प्रशासन देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
ओळखपत्र व साहित्य जमा करण्याचे आदेश
कार्यमुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने महापालिकेचे ओळखपत्र, संबंधित लॉग बुक, नस्ती (Files) आणि सर्व कार्यालयीन साहित्य तात्काळ संबंधित सहाय्यक आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.