
सांगली (प्रतिनिधी), ता.२ : विश्रामबाग येथील लक्ष्मी मंदिर परिसरात आज एका भीषण अपघाताने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. भरधाव ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, संजयनगर पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू टीमच्या अतुलनीय तत्परतेमुळे या दोन्ही महिलांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयनगर येथील रहिवासी रेवती फराटे (वय ४३) आणि धनश्री शेंडगे (वय ३२) या आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना लक्ष्मी मंदिराजवळ ट्रक आणि दुचाकी च्या झालेल्या धडकेत दुचाकी वरील दोन्ही महिला ट्रकच्या खाली अडकल्या गेल्या होत्या. ही दृश्ये पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अभिजीत सावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलिसांच्या स्पेशल रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू टीमचे कैलास वडर आणि पोलीस अंमलदार अभिजीत सावंत यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, अत्यंत शिताफीने बचाव कार्य राबवले आणि महिलांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना तातडीने शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ वाचला आणि महिलांना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले.