
मिरज / कराड, ता.२८: मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांचे पौत्र युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांचा विवाह सोहळा सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील यांची पौत्री ची. सौ. कां. अनुसया सारंग पाटील यांच्यासोबत अत्यंत शाही थाटात संपन्न झाला. हा मंगलमयी सोहळा रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी गोटे (ता. कराड) येथे पार पडला. या शाही विवाह सोहळ्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. विविध पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि आजी-माजी मंत्र्यांनी उपस्थित राहून नववधू-वरांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
विवाहानंतर नववधू-वरांचे मिरजेत आगमन झाले. मिरज किल्ला बागेतील ऐतिहासिक श्रीमंत माधवजी देवालय येथे दर्शनासाठी त्यांचे आगमन झाले. त्यानंतर श्री गणेश तलाव येथील गणपती मंदिरापर्यंत त्यांची भव्य वरात काढण्यात आली. मिरज संस्थानच्या या शाही सोहळ्यामुळे मिरज आणि कराड परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.