भाजपला मोठा धक्का; खटावमधील बौद्ध व मातंग समाजाचा काँग्रेसला पाठिंबा



मिरज/खटाव,ता.२८: येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील खटाव येथे राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. खटावमधील बौद्ध समाजाचे ४०० आणि मातंग समाजाचे १५० असे एकूण सुमारे ६५० हून अधिक मतदान यावेळी भारतीय जनता पक्षाला न देता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता चौगुले-विनाताई पाटील यांना देण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला आहे. बौद्ध समाजाचे नेते परशुराम बनसोडे यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. लोकसभा आणि मागील विधानसभा निवडणुकीत बौद्ध व मातंग समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदारांना प्रभागातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. त्यांचा जाहीर प्रचारही करण्यात आला होता. मात्र, निवडून आल्यानंतर समाजातील नेत्यांना विश्वासात न घेणे आणि निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे यामुळे समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

या निर्णयाबाबत सविस्तर माहिती देताना परशुराम बनसोडे म्हणाले की, “आरंग गावचे माजी सरपंच अजित कांबळे आणि बेळंकी गावचे नेते दौलतराव कांबळे यांच्या शब्दाखातर आम्ही मागील वेळी भाजपला मतदान केले होते.”  “परंतु, समाजाचे मूलभूत प्रश्न आणि कामे आजही प्रलंबित आहेत. यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी यावेळी आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे.
खटाव प्रभागातील बौद्ध आणि मातंग समाजाची ही एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यात जाणार असल्याने महायुतीच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील काळात समाजाच्या हितासाठी काँग्रेस उमेदवाराला मोठ्या फरकाने विजयी करण्याचा निर्धार यावेळी समाज नेत्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे खटाव परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button