१५ जानेवारीला मतदानासाठी कामगारांना मिळणार ‘भरपगारी सुट्टी’; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई


सांगली, ता.१३ जानेवारी : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मतदान क्षेत्रात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने आणि खाजगी कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ‘भरपगारी सुट्टी’ जाहीर करण्यात आली आहे. सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आदेश दिले आहेत.


कोणाकोणाला लागू आहे हा नियम?
लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार, खालील क्षेत्रांतील कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही सुट्टी किंवा सवलत लागू असेल: सर्व दुकाने आणि व्यापारी आस्थापना.
निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे आणि नाट्यगृहे.
औद्योगिक उपक्रम आणि कारखाने.
माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्या.
शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेलर्स.


महत्वाची बाब: जर एखादा कर्मचारी निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील मतदार असेल, परंतु कामाच्या निमित्ताने त्या क्षेत्राबाहेर कार्यरत असेल, तरीही त्याला मतदानासाठी सुट्टी मिळणे बंधनकारक आहे. ज्या अत्यावश्यक किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी कामगारांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची विशेष सवलत देणे मालकांवर बंधनकारक राहील. मात्र, यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.


तक्रार कोठे करावी?
जर कोणत्याही आस्थापना मालकाने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत नाकारली, तर मतदारांना खालील ठिकाणी तक्रार करता येईल:
कार्यालय: सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली.
दूरध्वनी: ०२३३-२९५०११९
ई-मेल: aclsangli@gmail.com


मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा पाया आहे, त्यामुळे सर्व कामगारांनी या सवलतीचा लाभ घेऊन मतदान करावे आणि मालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button