सांगलीत भेसळखोरांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’: सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त, १२ जणांवर गुन्हे दाखल


सांगली, ता.१४ जानेवारी : राज्यातील भेसळखोर आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम उघडली आहे. सांगली जिल्ह्यात विशेष भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल १ कोटी २३ लाख ८५ हजार ६४० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून, एकूण १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात ९ ते १२ जानेवारी २०२६ या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.


मगरमच्छ कॉलनी कारवाई:एका वाहनावर (MH 10 CR 6460) छापा टाकून वाहतूक केला जाणारा सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला. मुद्देमालाची किंमत: २४.९० लाख (तंबाखू) + ६ लाख (वाहन) = ३०.९० लाख रुपये. या प्रकरणी ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरज-म्हैसाळ रोड कारवाई:कर्नाटक पासिंगच्या वाहनावर (KA 13 C 8074) कारवाई करण्यात आली. मुद्देमालाची किंमत: ७६.९५ लाख (साठा) + १६ लाख (वाहन) = ९२.९५ लाख रुपये. यात खरेदीदार, पुरवठादार आणि उत्पादकांसह ७ आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले.


ही कारवाई विशेष भरारी पथकाचे प्रमुख यदुराज दहातोंडे (सहायक आयुक्त, भंडारा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये सांगलीचे सहायक आयुक्त नि. सु. मसारे, श्री. समुद्रे आणि अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर, मंगेश लवटे, अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे आणि प्रणव जिनगर यांनी सक्रिय सहभाग घेतला.


“राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांची गय केली जाणार नाही. येणाऱ्या काळातही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील.”
— सहायक आयुक्त (अन्न), सांगली

जप्त करण्यात आलेला सर्व साठा सील करण्यात आला असून, आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button