
सांगली,ता.१३ जानेवारी: राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.
निवडणुकीची व्याप्ती:
जिल्हा परिषद: ६१ गट.
पंचायत समित्या: १२२ गण (आटपाडी, जत, खानापूर-विटा, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा आणि मिरज).
एकूण मतदार: १८ लाख १८ हजार ७३६.
मतदान केंद्रे: २,०३९.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम:
टप्पादिनांक आणि वेळ
निवडणूक सूचना प्रसिद्ध करणे
१६ जानेवारी २०२६
नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करणे
१६ ते २१ जानेवारी २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३)
अर्जांची छाननी
२२ जानेवारी २०२६ (सकाळी ११ पासून)
वैध उमेदवारांची यादी प्रसिद्धी
२२ जानेवारी २०२६ (छाननीनंतर लगेच)
उमेदवारी मागे घेण्याची मुदत
२३, २४ आणि २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी
२७ जानेवारी २०२६ (दुपारी ३:३० नंतर)
मतदानाचा दिवस
०५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७:३० ते ५:३०)
मतमोजणी आणि निकाल
०७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० पासून)
राजपत्रात निकाल प्रसिद्धी
१० फेब्रुवारी २०२६ पर्यंत
(टीप: १८ जानेवारी, २५ जानेवारी आणि २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारणे किंवा मागे घेण्याची प्रक्रिया होणार नाही.)
निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांतअधिकारी किंवा तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
“निवडणूक जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे. लोकशाहीचा हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.”
— अशोक काकडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सांगली.
या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून, गावागावात आता निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.