सांगलीच्या डॉक्टरांची कमाल! अपघातात जखमी झालेल्या गाभण मादी गव्यावर यशस्वी ‘सिझेरियन’ शस्त्रक्रिया

सांगली/कोल्हापूर ता.१३: माणुसकी आणि वैद्यकीय कौशल्याचा एक अनोखा प्रत्यय नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे आला. वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका मादी रानगव्यावर सांगलीच्या पशुसंवर्धन विभागाच्या टीमने यशस्वी ‘सिझेरियन’ ऑपरेशन करून तिचे प्राण वाचवले आहेत.


नेमकी घटना काय?
कोल्हापूरमधील कडगाव परिसरात एका मादी रानगव्याला वाहन अपघातात गंभीर इजा झाली होती. स्थानिक स्तरावर डॉ. संतोष वाळवेकर यांनी ही परिस्थिती पाहून तातडीने सांगलीतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला. माहिती मिळताच सांगली जिल्ह्यातून पशुसंवर्धन विभागाची एक विशेष टीम घटनास्थळी रवाना झाली.


आव्हानात्मक शस्त्रक्रिया:
तपासणी दरम्यान असे निदर्शनास आले की, जखमी मादी रानगवा गाभण आहे. अपघातामुळे तिला अंतर्गत दुखापत झाली होती आणि रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणावर होत होता. गर्भातील वासराची हालचाल मंदावल्याचे लक्षात येताच, मादी गव्याचा जीव वाचवण्यासाठी तातडीने सिझेरियन ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.


या टीमने फत्ते केली मोहीम:
पशुसंवर्धन विभाग (वाळवा) आणि वनविभाग (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अत्यंत गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. या मोहिमेत डॉ. सचिन वंजारी, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रविण निमसे, मुकुंद वाटेगावकर खालील डॉक्टरांनी मोलाची कामगिरी बजावली .


यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मादी गव्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. शस्त्रक्रियेनंतरची तिची स्थिती स्थिर असून, तिला पूर्णपणे बरे करण्यासाठी वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. रानगव्यासारख्या महाकाय आणि वन्य प्राण्यावर अशा प्रकारे यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल या डॉक्टर टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button