
मिरज, ता.४ जानेवारी : बोलवाड (ता. मिरज) ग्रामपंचायत हद्दीतील ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यूचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस यश आले आहे. रेल्वेचे तिकीट आणि एका ‘चिक्की’ विक्रेत्याच्या फोन-पे ट्रांजॅक्शनमुळे या क्रूर हत्येचा उलगडा झाला असून, पतीनेच आपल्या वडिलांच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार (ता.२३) डिसेंबर २०२५ रोजी बोलवाड येथील कुमार पाटील यांच्या ऊसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाचा ओळख पटवणे कठीण झाले होते. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/ कुमार पाटील आणि पोउपनि/ महादेव पोवार यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळाच्या पाहणीत पोलिसांना पुणे ते मिरज प्रवासाचे १६ डिसेंबरचे रेल्वे तिकीट सापडले.
या एका धाग्यावरून पोलिसांनी मिरज रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत महिलेसोबत दोन संशयित व्यक्ती दिसून आल्या. सीसीटीव्हीमधील व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी स्थानकावरील दुकानदार आणि रिक्षा चालकांकडे चौकशी केली. यावेळी एका चिक्की विक्रेत्याने महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याने सांगितले की, या व्यक्तींकडे पैसे नसल्याने त्यांनी नातेवाईकांकडून त्याच्या (विक्रेत्याच्या) फोन-पे वर ३००० रुपये मागवून घेतले होते. तसेच एका रिक्षा चालकाने या तिघांना टाकळी गावच्या ओढ्याजवळ सोडल्याचे व त्यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले. पोलीस कर्मचारी प्रमोद साखरपे यांनी तांत्रिक विश्लेषण करून चंदादेवी यादव आणि दीनदयाळ यादव (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) यांचे मोबाईल क्रमांक मिळवले.
यानंतर पोलिसांची पथके उत्तर प्रदेश आणि हरियाणाला रवाना झाली. संशयित आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव आणि दीनदयाळ रामबाली यादव यांना ताब्यात घेऊन सांगलीत आणले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आकाशने सांगितले की, त्याची पत्नी नितू ऊर्फ शालिनी यादव हिने उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे कुटुंबाविरुद्ध तक्रार दिली होती. तो वाद मिटवल्यानंतर तिला सोबत घेऊन राहण्याच्या बहाण्याने ते मिरजेत आले. १६ डिसेंबर रोजी पहाटे मिरज रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर रिक्षाने ते टाकळी ओढ्याजवळ गेले. तेथील ऊसाच्या शेतात नेऊन बाप-लेकाने शालिनीचा शॉलने गळा आवळून खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून ते पुन्हा उत्तर प्रदेशला पळून गेले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी यशस्वी केली आहे. सपोनि रणजित तिप्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित सिद करीत आहेत.