
खटाव, ता.४ जानेवारी (ता. मिरज): तालुका शिक्षण विभाग, पंचायत समिती मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा खटावच्या मुलींनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. कबड्डी खेळातील लहान गट आणि मोठा गट अशा दोन्ही गटांत या शाळेच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून अजिंक्यपद मिळवले. या विजयामुळे दोन्ही गटांची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भोसे येथील गुरुकुल विद्यालय येथे १ ते ३ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. मिरज तालुक्यातील एकूण १४ केंद्रांतील प्राथमिक शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये खटावच्या मुलींनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांना नमवून विजयाला गवसणी घातली.
मुलींच्या या घवघवीत यशामागे शाळेतील शिक्षकांचे परिश्रम आणि मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. प्रामुख्याने: रावसाहेब बेडगे (सरपंच, खटाव), मनोज कुमार बिळूरे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), सहदेव बागी (मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख) तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
सदर स्पर्धा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेख साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी धडस साहेब आणि विजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. मुलींच्या या यशाबद्दल खटाव गावात सर्वत्र कौतुक होत आहे. विजयानंतर गावात उत्साहाचे वातावरण असून, सरपंच रावसाहेब बेडगे, ग्रामपंचायत सदस्य गणपती मोरे व गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.