सांगली, ता.३ : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीच्या ऐतिहासिक जुन्या स्टेशन चौकात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेने आगामी निवडणुकीसाठी महायुतीचे ‘मिशन सांगली’ स्पष्ट केले आहे. सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगलीकरांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये प्रामुख्याने ४५४ कोटींची वारणा उद्भव योजना आणि पुराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ५९१ कोटींच्या कामांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले महत्त्वाचे प्रकल्प:
पाणी पुरवठा: वारणा उद्भव योजनेला ४५४ कोटींची मान्यता (शुद्ध आणि मुबलक पाण्यासाठी).
महासभा इमारत: अद्ययावत महापालिका इमारतीच्या बांधकामासाठी विशेष निधी.
पायाभूत सुविधा: रस्ते विकासासाठी १०० कोटी आणि पाणी योजनांसाठी १०५ कोटी रुपये.
स्वच्छता व सांडपाणी: २५३ कोटींची ड्रेनेज लाईन आणि ८९ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प.
शहर सुशोभीकरण: एलईडी लाईट्ससाठी ६० कोटी, १०० फुटी रस्ता व काळी खण विकासासाठी १८ कोटी.
कनेक्टिव्हिटी: प्रलंबित कवलापूर विमानतळ लवकरच सुरू करण्याचे आश्वासन.
“राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात मी सांगलीच्या पवित्र मातीतून करत आहे. सांगलीचा विकास हाच आमचा ध्यास असून महायुतीला मिळणारा प्रतिसाद विजयाची नांदी आहे.” — ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यावेळी पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, गेल्या पाच वर्षांतील विकासकामे आणि महायुतीची ताकद यामुळे सांगली महापालिकेत पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकेल. या सोहळ्याला आमदार सुरेश भाऊ खाडे, सुधीरदादा गाडगीळ, सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख, संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.