
सांगली, ता.१ : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सांगली शहरात रक्ताचा सडा पडला असून, कॉलेज कॉर्नर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत दोन तासांच्या आत दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार आज गुरुवार (ता.१) दुपारी दोनच्या सुमारास सांगलीच्या मध्यवर्ती कॉलेज कॉर्नर परिसरात विष्णू सतीश वडर (वय २१, रा. वडर कॉलनी, सांगली) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आरोपींनी लोखंडी चाकूने विष्णूच्या डोक्यावर, पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात विष्णूचा जागीच मृत्यू झाला. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) गोपनीय माहितीच्या आधारे दोन पथके तयार केली आणि अवघ्या दोन तासांत कुपवाड परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपींची नावे आर्यन हेमंत पाटील , वय २३ वर्ष , आदित्य प्रमोद वालकर, वय २१ वर्ष, दोघेही रा. कुपवाड असे आहेत. तपासाचा प्राथमिक अंदाजानुसार विष्णू वडर आणि आरोपींमध्ये जुने भांडण होते. याच वादातून आज भररस्त्यात हा खुनी हल्ला करण्यात आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले होते, ज्याची फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत.
भरदिवसा शहराच्या मुख्य भागात घडलेल्या या घटनेमुळे सांगलीत भीतीचे वातावरण पसरले होते, परंतु पोलिसांनी तत्परतेने आरोपींना जेरबंद केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.