
खटाव, ता.१ : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिरज तालुक्यातील खटाव येथे एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सीमेवर असलेल्या घोरपडे वस्तीवर बुधवारी मध्यरात्री पाच ते आठ सशस्त्र चोरट्यांनी धुमाकूळ घालत महादेव रामचंद्र घोरपडे आणि त्यांच्या पत्नी सुमन घोरपडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सोन्याचे दागिने आणि रोकड पळवून नेली.
अधिक माहिती अशी की,
बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास चोरट्यांनी घोरपडे यांच्या घराचा दरवाजा बडवला. दरवाजा उघडताच चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखमा झाल्या आहेत, तर काठीने केलेल्या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. चोरट्यांच्या क्रूरतेचा कळस म्हणजे, सुमन घोरपडे यांच्या कानातील दागिने ओढून घेतल्याने त्यांचे कान फाटले आहेत. गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाईल असा मिळून सुमारे दीड तोळे सोने आणि २५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दांपत्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नातेवाईक जागे झाल्याचे पाहून चोरट्यांनी तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी.आय. सिद, डी.वाय.एस.पी. भागवत साहेब, सांगली क्राईम ब्रँचचे प्रमुख पी.आय. संजीव झाडे, ए.पी.आय. सुनील गुरव (डी.बी. पथक) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सीमावर्ती भाग चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट:
खटाव हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असल्याने चोरट्यांना गुन्हे करून शेजारच्या राज्यात पळून जाणे सोपे झाले आहे. घोरपडे वस्ती ही मळा भागात आणि कर्नाटक हद्दीजवळ असल्याने चोरट्यांनी या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी, वस्तीवरील घराबाहेर कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने चोरट्यांचे फावले आहे.
पोलीस आवाहन आणि उपाययोजना:
या वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या घराबाहेर आणि मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे खटाव परिसरात भीतीचे वातावरण असून, ग्रामीण पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.