“कुपवाड: रस्त्यावर लघुशंका केल्याच्या वादातून चौघांना बेदम मारहाण; चिकन ६५ विक्रेत्यासह मुलावर गुन्हा दाखल.”


कुपवाड, ता.२३ : परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याच्या एका शुल्लक कारणावरून चिकन ६५ गाडीच्या मालकाने, त्याच्या मुलाने आणि साथीदारांनी मिळून चार तरुणांना लोखंडी झाऱ्या आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चौघेही तरुण गंभीर जखमी झाले असून, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मारुती सुभाष सरगर (वय २०, रा. बामनोळी) हे त्यांचे सहकारी बसवराज बिलूर, काका राजेंद्र सरगर आणि पुतण्या रविराज सरगर यांच्यासोबत २२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास कुपवाड येथील सूतगिरणी चौक परिसरात चिकन ६५ खाण्यासाठी गेले होते. यावेळी रविराज सरगर आणि बसवराज बिलूर हे दोघे रस्त्याच्या कडेला लघुशंका करण्यास गेल्याच्या कारणावरून चिकन ६५ गाडीच्या मालकाने आणि त्याच्या मुलाने त्यांना हटकले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर लवकरच भीषण हाणामारीत झाले. संतापलेल्या हॉटेल मालकाने, त्याच्या मुलाने आणि दोन अनोळखी साथीदारांनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना घेरले. आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी झाऱ्याने, लोखंडी वस्तूने आणि काठीने या तरुणांवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात मारुती सरगर, राजेंद्र सरगर, रविराज सरगर आणि बसवराज बिलूर हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर फिर्यादी मारुती सरगर यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आता या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button