
जत, ता.२३ : जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजार आवारात १९ डिसेंबर रोजी मिळालेल्या अज्ञात इसमाच्या नग्न मृतदेहाचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. केवळ ‘दारू पाजतो’ असे म्हणून खोटे बोलल्याच्या रागातून आणि शिवीगाळ केल्यामुळे या इसमाचा दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
पोलीसांच्या अधिक माहितीनुसार
१९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास जत बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका पुरुषाचा नग्न अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. मृताच्या डोक्यात आणि अंगावर गंभीर जखमा होत्या. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढली असता, मयत व्यक्तीचे नाव विकास मलकारी टकले (रा. टकले वस्ती, उमदी) असल्याचे समोर आले. घटनास्थळी कोणताही तांत्रिक पुरावा नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जत्रेच्या गर्दीतील संशयास्पद हालचालींवर लक्ष केंद्रित केले. शिवाजी पेठ, जत येथील तुराई प्लॉटजवळ दोन संशयित थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून रविंद्र आबासाहेब बंडगर (वय ३०) आणि विराज संजय पांढरे (वय २०) या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री ते मार्केट यार्डात शेकोटीजवळ बसले होते. तिथे त्यांची विकास टकले यांच्याशी ओळख झाली. विकास यांनी ‘दारू पाजतो’ असे सांगून दोघांना दुकानाजवळ नेले, मात्र तिथे गेल्यावर पैसे नसल्याचे सांगितले. खोटे बोलून शेकोटीवरून उठवून आणल्याचा राग मनात धरून दोघांनी विकासला मोटारसायकलवरून जनावरांच्या बाजारात नेले. तिथे लाकडी पट्टीने मारहाण सुरू असताना विकासने आईवरून शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी त्याचे कपडे काढून डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला.
अटक केलेले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही मारामारी आणि आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबी पथकाचे कौतुक केले आहे. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.