
कुपवाड, ता.२३ : “माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासात मदत करतो आणि गुंडांचा बंदोबस्त करतो असे सांगून कुपवाड पोलीस ठाण्यातील एका तत्कालीन अधिकाऱ्यासह दोन हवालदारांनी माझ्याकडून ७ लाख रुपये उकळले आहेत. पैसे देऊनही गुंडांकडून धमक्या सुरूच असून आता पोलीस पुन्हा पैशांची मागणी करत आहेत,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे पदाधिकारी सागर राजाराम माने यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.
सागर माने यांच्यावर ८ जुलै २०२४ रोजी वाघमोडेनगर (कुपवाड) येथे १० गुंडांनी प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर मुख्य सूत्रधारांना अटक करणे आणि त्यांच्यावर ‘मोक्का’ लावण्याचे आश्वासन कुपवाड पोलीस ठाण्यातील एका तत्कालीन अधिकाऱ्याने आणि दोन हवालदारांनी दिले होते.
माने यांनी आरोप केला आहे की, आरोपींचा बंदोबस्त व “तुला जिवंत राहायचे असेल तर पैसे द्यावेच लागतील” अशी भीती घालून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन टप्प्यात (४ लाख आणि ३ लाख) एकूण ७ लाख रुपये घेतले. माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, एवढी मोठी रक्कम देऊनही पोलिसांनी गुंडांवर ठोस कारवाई केली नाही. उलट जामिनावर सुटलेले गुंड परिसरात उजळ माथ्याने फिरत आहे. याबाबत तक्रार करण्यास गेल्यावर पोलिसांनी दखल न घेता त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा १३ डिसेंबर रोजी त्यापैकी एक हवालदार माने यांच्या घरी गेला. “तुझ्या प्रकरणातील तीन गुंड फरार असून ते तुझा खून करण्याच्या तयारीत आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा पैशाची मागणी या हवालदाराने केल्याचे माने यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“सध्या मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आहोत. आमच्या जीवितास काहीही बरे-वाईट झाल्यास संबंधित गुंड आणि ते तीन पोलीस जबाबदार असतील,” असे माने यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही केली असून, निष्पक्ष चौकशी होऊन न्याय न मिळाल्यास पोलीस मुख्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.