
कुपवाड, ता.२३ : कुपवाड येथील सूतगिरणी चौक परिसरात ‘चिकन ६५’ संपल्याचे सांगितल्याच्या रागातून दोन अनोळखी इसमांनी एका व्यावसायिकाच्या कुटुंबावर आणि ग्राहकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करण्यात आला असून, त्यांच्या आईसह मुलालाही दगडाने मारहाण करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साजिद रमजान मुलाणी (वय ४२, रा. वसंत नगर, मिरज) यांचा कुपवाडमधील सूतगिरणी चौक येथे ‘चिकन ६५’ विक्रीचा गाडा आहे. सोमवार (ता.२२) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास साजिद आपला गाडा बंद करण्याची तयारी करत होते. यावेळी एका मोटारसायकलवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी साजिद यांच्याकडे चिकनची मागणी केली. मात्र, “आता चिकन संपले आहे, तुम्ही इथून जावा,” असे साजिद यांनी त्यांना सांगितले. याचा राग मनात धरून आरोपींनी “तुला लय मस्ती आहे का?” असे म्हणत साजिद यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. आरोपींनी सोबत आणलेल्या एका लोखंडी वस्तूने साजिद मुलाणी यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यावेळी साजिद यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मातोश्री अजमबी मुलाणी, मुलगा साहिल मुलाणी आणि तिथे उपस्थित असलेले ग्राहक सुमित विजय गायकवाड यांनाही आरोपींनी दगडाने बेदम मारहाण करून जखमी केले. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. साजिद मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा। पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कोळी हे करत आहे