मिरजेत पोलिसांची मोठी कारवाई: पिस्टलसह दोघांना अटक

नाकाबंदीत १०.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मिरज,  ता.१७ : मिरज शहरात पोलिसांनी केलेल्या कडक नाकाबंदी दरम्यान एका ‘इनोव्हा’ कारमधून बेकायदेशीर शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. दस्तगीर शोकत बाबा वय ३७ वर्ष रा. इसापूर गल्ली, मिरज, अजल महंमद मदार सय्यद वही, वय ३२ वर्ष रा. इसापूर गल्ली, मिरज असे अटक केलेल्या दोघा संसायितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतुसे आणि कारसह एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार जिल्ह्यात आगामी निवडणुका आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची ‘इनोव्हा’ कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी ही कार थांबवून तिची झडती घेतली असता, कारमध्ये बेकायदेशीर शस्त्र साठा आढळला. त्यांच्याकडून  १ पिस्टल, एक जिवंत काडतुस आणि गुन्ह्यात वापरलेली  ‘इनोव्हा’ कार असा एकूण १० लाख ४२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे शस्त्र कोठून आणले आणि त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.

जिल्ह्यात ३० डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना अशी शस्त्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य गुन्हा टळला असल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. मिरज पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button