खटाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; ७०० खेळाडूंचा सहभाग, मात्र ‘शालेय राजकारणा’मुळे चर्चांना उधाण

खटाव येथील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सलगरे विरुद्ध खटाव यांच्यातील कबड्डी सामन्याचा थरार आणि उपस्थित मान्यवर.

खटाव, ता.१८ :  मिरज तालुक्यातील खटाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य क्रीडांगणावर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला. मात्र, या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी स्थानिक राजकारणाचे सावट पाहायला मिळाले. गावातील एकाच गटाच्या नेत्यांना निमंत्रित केल्याने आणि विरोधी गटाला डावलल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांवर 'राजकारण' केल्याचा आरोप होत असून, ग्रामस्थांमध्ये यावरून तीव्र चर्चा रंगली आहे. या केंद्रस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन लिंगनूरचे माजी सरपंच मारुती पाटील आणि खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, गावातील इतर नेत्यांना डावलून केवळ एकाच गटाला प्राधान्य का देण्यात आले? तसेच, स्थानिक नेत्यांना विसरून शेजारच्या गावातील नेत्यांना कसे काय बोलावले? यामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर राजकारणात ओढले गेल्याची टीका होत आहे.

राजकीय चर्चा बाजूला ठेवली तर मैदानावर ७०० हून अधिक चिमुकल्या खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत लिंगनूर, खटाव, सलगरे, जानराववाडी, चाबुकस्वारवाडी या गावांमधील जिल्हा परिषद शाळा सहभागी झाल्या आहेत. यातिल क्रीडा प्रकार - खो-खो, कबड्डी, रिले (सांघिक) आणि गोळाफेक, धावणे, लांब उडी (वैयक्तिक). मुले आणि मुली अशा दोन विभागात लहान व मोठ्या गटात सामने खेळवले जात आहेत.

क्रीडा ध्वज फडकवून आणि क्रीडा शपथ घेऊन सामन्यांना सुरुवात झाली. उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद शाळा सलगरे नंबर १ विरुद्ध जिल्हा परिषद केंद्र शाळा खटाव (लहान गट मुले) यांच्यात झाला. लिंगनूरचे माजी सरपंच मारुती पाटील यांच्याकडून सहभागी ७०० खेळाडूंना दुपारच्या भोजनाची (आहार) व्यवस्था करण्यात आली. क्रीडा स्पर्धेचे यशस्वी संयोजन केंद्रप्रमुख सहदेव बागी, क्रीडा समिती अध्यक्ष हणमंत आरगे, समन्वयक आकाश जाधव आणि खटाव केंद्र शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले आहे. याप्रसंगी शिक्षक बँकेचे संचालक मिलन नागणे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button