
मिरज, ता.१७ : मिरज येथील रमा उद्यान परिसरात एका ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांचा मिरज शहर पोलिसांनी अवघ्या २० तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. प्रतिक प्रदीप पाटील (वय ३२) आणि मंथन गंगाराम कुंडेकर (वय १८, दोघे रा. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी रमा उद्यान परिसरात ही चोरीची घटना घडली होती. आरोपींनी एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. या घटनेची मिरज शहर पोलीसांत तक्रार दाखल केली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या २० तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी ९ ग्रॅम वजनाचे सोने, २७ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा हा एकूण १ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही यशस्वी कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, आण्णासाहेब गादेकर, भैरवनाथ पाटील, निलेश कदम, झाकीरहुसेन काझी, प्रविण वाघमोडे, शक्ती पोकळेकर, नितीन मोरे, राजेश गवळी, राहुल गोसावी, दत्तात्रय राणे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे आणि दिपक परीट यांचा समावेश होता. मिरज पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.