
लिंगनूर, ता.१७ : मिरज तालुक्यातील लिंगनूर येथील बौद्ध विहार आणि बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा बौद्ध समाज लिंगनूर आणि अभिरा फाऊंडेशन लिंगनूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात धम्म दीक्षा समारंभ तसेच महत्त्वपूर्ण धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभाची सुरुवात पूज्य भन्ते डॉ. प्रा. यशकाश्यपायनजी यांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन आणि पूजापाठ विधीने झाली. त्यानंतर पूज्य भन्ते धम्मबोधीजी यांनी उपस्थित उपासक-उपासिकांकडून वंदना आणि सूत्रपठण करून घेतले. भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आयु. जितेंद्र कोलप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
बुद्ध आणि आंबेडकर विचारांचे अनमोल मार्गदर्शन
धम्मदेसना देताना भन्ते डॉ. प्रा. यशकाश्यपायनजी यांनी बुद्ध विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामान्य उपासक-उपासिकांना सहजपणे समजू शकतील अशा सोप्या भाषेत अनमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला होता
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभिरा फाऊंडेशन लिंगनूरचे संचालक आयु. गौतम श्रीपती बनसोडे आणि त्यांच्या पत्नी आयु. जयश्री गौतम बनसोडे यांनी पूज्य भन्ते डॉ. प्रा. यशकश्यपायनजी यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी लिंगनूर येथील सर्व उपासक, उपासिका आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांसाठी सुमधूर भोजनदान ठेवण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बनसोडे, पोपट बनसोडे, धोंडीराम बनसोडे, गौतम बनसोडे, सागर बनसोडे, आप्पासो बनसोडे, महादेव बनसोडे यांच्यासह अनिता बनसोडे, मंगल बनसोडे, संगीता बनसोडे, सविता बनसोडे, जयश्री बनसोडे, पुष्पा बनसोडे, साधना कांबळे, कविता कलंत्री, पद्मा बनसोडे, शोभा बनसोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार धोंडीराम बनसोडे गुरुजी यांनी मानले आणि धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.