ढोणे यांच्या आमरण उपोषणाला यश; बिरोबा बनातीचा मैला प्रकल्प रद्द करण्याची प्रशासनाची लेखी घोषणा

कवठेमहांकाळ, ता.१६ :  तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील ‘बिरोबा बन’ शेजारील गायरान जमिनीवर प्रस्तावित असलेला मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प  जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर रद्द केला आहे. या निर्णयामुळे बिरोबा भक्तांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मोठे यश मिळाले आहे.

प्रशासकीय मान्यतेनंतरही आंदोलनाची गरज

मौजे आरेवाडी येथील बिरोबा बन शेजारील गायरान जमिनीवर मैला प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली होती. या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी तसेच धनगर विवेक जागृती अभियानाने प्रशासनाकडे निवेदन दिले होते, पण प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे नाइलाजाने विक्रम ढोणे यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

उपोषणाची दखल, प्रकल्प रद्द

विक्रम ढोणे यांच्या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी किरण सायमोटे यांनी स्वतः उपोषणस्थळी येऊन, प्रस्तावित मैला प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याचे लेखी पत्र ढोणे यांना दिले.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विक्रम ढोणे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. यावेळी तानाजी कटरे, तानाजी व्हनमाने, अशोक गोरड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बिरोबा बन हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आणि त्याच्या शेजारील पर्यावरणावर परिणाम करणारा प्रकल्प रद्द झाल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button