फिटनेसचा कस : इतिहासाची उजळणी : मैत्रिचा उत्सव

सांगली, ता.१५ : ग्लोरी फिटनेस जिम अँड हेल्थ क्लब, बालाजीनगर यांनी आयोजित केलेली रायगड ट्रेकिंग ट्रिप म्हणजे फिटनेसचा कस, इतिहासाची उजळणी आणि मैत्रीचा उत्सव ठरला. व्यायामापुरते मर्यादित न राहता निसर्गाच्या सान्निध्यात शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्याचा संदेश ट्रेकमधून देण्यात आला. शुक्रवारी (ता.१२) रात्री साडेदहा वाजता ३५ सीटर ट्रॅव्हल्सने जिम परिसरातून ट्रिपला सुरुवात झाली. प्रवासभर गाणी, नृत्य, गप्पा आणि हास्याचा जल्लोष होता. शनिवारी (ता.१३) पहाटे सव्वासहा वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच सर्वांनी थोडा विसावा घेत अंघोळ व नाश्त्याची व्यवस्था केली. सकाळी नऊच्या सुमारास “जय भवानी, जय शिवाजी”च्या गर्जनांनी किल्ला चढाईला प्रारंभ झाला.
एकमेकांना सावरत, थांबत-थांबत पाणी-पोहा करत सदस्यांनी चढाई पूर्ण केली. दुपारी सव्वा बारा ते साडेबारा दरम्यान किल्ल्यावर पोहोचल्यावर मार्गदर्शकाच्या मदतीने हत्ती तलाव, गंगा तलाव, बुरुज, बाजारपेठ, राजसदर, खलबतखाना, राणीवसा, अष्टप्रधान मंडळाची वास्तू, छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ, शिरकाई देवी मंदिर, होळीचा माळ आणि जगदीश्वर मंदिर अशा ऐतिहासिक ठिकाणांची माहिती घेतली. इतिहास ऐकताना फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगने क्षण अमर केले.दुपारी दोनच्या सुमारास उतराईला सुरुवात झाली. काहींनी पायपीट तर काहींनी रोपवेचा पर्याय निवडला. सायंकाळी जेवण व विश्रांतीनंतर रायगड पायथा सोडत परतीचा प्रवास सुरू झाला. दिवसभराच्या श्रमानंतर ट्रॅव्हल्समध्ये सदस्य शांतपणे विसावले. रविवारी (ता.१४) पहाटे तीन वाजता बालाजीनगर येथील जिम आवारात ट्रिपची सांगता झाली.
या यशस्वी ट्रिपचे नियोजन रॉबर्ट आवळे, प्रशिक्षक सुसेन थोरात, सईद जमादार, मार्गदर्शक ऋषीकेश माने यांनी केले. विशेषतः रॉबर्ट सर यांनी संपूर्ण प्रवासात शिस्त, सुरक्षितता आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आदर्श निर्माण केला. याबाबत सदस्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. ग्लोरी फिटनेस जिमचा हा उपक्रम फिटनेससोबत संस्कृती आणि संघभावना जोपासणारा ठरला.
ट्रेकिंग म्हणजे केवळ फिरायला जाणे नाही, तर ते संपूर्ण शरीर आणि मनासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. सतत चालणे, चढ-उतार आणि बदलते वातावरण यामुळे सहनशक्ती, स्टॅमिना व मानसिक बळ वाढते. जिममधील वर्कआउटला निसर्गाची जोड मिळाल्याने फिटनेस अधिक परिणामकारक होतो. अशा ट्रिपमुळे सदस्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी ट्रेकिंगसारख्या उपक्रमांचा जीवनशैलीत समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे.
― रॉबर्ट आवळे , संचालक व प्रशिक्षक ग्लोरी फिटनेस जिम , बालाजीनगर