
सांगली, ८ नोव्हेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा) : सांगली महानगरपालिकेने आयुक्त सत्यम गांधी यांच्या ‘Zero Tolerance’ धोरणानुसार शहरात ‘GVP (Garbage Vulnerable Point) मुक्त शहर’ मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर २०२५ या एका महिन्यात शहरातील सातत्याने कचरा टाकला जाणाऱ्या २७ प्रमुख GVP पॉइंट्सचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यात आले आहे.
स्वच्छता व नियमभंगावर कठोर कारवाई करत मनपाने नोव्हेंबर महिन्यात नियमबाह्य प्लास्टिक (रु. ९०,५००/-) आणि उघड्यावर कचरा टाकणे (रु ६०,४००/-) यासाठी एकूण १ लाख ५० हजार ९००/- रुपयांची दंडाची विक्रमी वसुली केली आहे.

या मोहिमेचे नेतृत्व उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर यांनी केले. बंद केलेल्या प्रत्येक GVP ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छता फलक, भरारी पथकाद्वारे सतत देखरेख आणि आवश्यक ठिकाणी व्हिडिओ निरीक्षण सुरू करण्यात आले आहे.
विभागीय कामगिरी (नोव्हेंबर दंड):
- सांगली विभाग (१ व २): ८१,९००/- रु. दंड वसूल. बापट बाल शाळा, विष्णू घाट, चिंतामणी नगरसह १३ स्पॉट्स बंद.
- कुपवाड विभाग (३): ६९,०००/- रु. दंड वसूल. यशवंत नगर रोड, धोंडीकाका कॉम्प्लेक्ससह ७ स्पॉट्स बंद.
- मिरज विभाग (४): सराफ कट्टा, लोणी बाजार, गणेश तलाव पॉईंटसह ७ स्पॉट्स बंद.
आयुक्तांनी नागरिकांना कचरा केवळ घंटागाडीत देण्याचे आणि प्लास्टिकबंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर आणि तात्काळ कारवाई सुरू ठेवण्याचा ठाम संदेश दिला आहे.