
सांगली, ०७ डिसेंबर ( सांगली- टुडे वृत्तसेवा) : शिगाव (ता. वाळवा) येथील लक्ष्मी-विठ्ठल बिरदेव मंदिरात दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेला यश आले आहे. पोलिसांनी प्रकाश जगन्नाथ सदामते (वय ३२, रा. आमणापूर, ता. पलूस) या सराईत गुन्हेगाराला ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रकमेसह अटक केली आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी सांगली व सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
(ता.१७) ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास शिगाव येथील लक्ष्मी-विठ्ठल बिरदेव मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून श्री लक्ष्मीदेवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले होते. या घटनेप्रकरणी पांडुरंग किसन गावडे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना सदर गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने, (ता.६) डिसेंबरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांचे पथक ईश्वरपूर विभागात गस्त घालत असताना, अंमलदार अभिजीत ठाणेकर आणि सुरज थोरात यांना त्यांच्या गोपनीयांकडुन माहिती मिळाली की, एक संशयीत इसम सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मिरजवाडी (ता. वाळवा) येथे येणार आहे. लागलीच पथकाने सापळा रचून संशयीत इसम प्रकाश जगन्नाथ सदामते यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करून अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख ४१०/- रुपये मिळून आले. अधिक चौकशीत त्याने हे मंगळसूत्र दीड महिन्यापूर्वी शिगाव येथील मंदिरातून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदामतेकडून ६० हजार ४१०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी प्रकाश सदामते हा अभिलेखावरील गुन्हेगार
पलूस आणि चिंचणी वांगी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, मा. उपविभागीय दंडाधिकारी सो. कडेगांव यांच्या आदेशानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये त्याला सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
या आरोपीला पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या पुढील गुन्ह्याचा अधिक तपास पोहेकाँ महादेव कदम हे करत आहेत.