
सांगली, ६ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा) : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्सच्या दिशेने
निर्णायक पाऊल उचलत ‘स्मार्ट फ्लीट व्यवस्थापन प्रणाली’ (Smart GPS System) लागू केली आहे. आयुक्त मा. सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या मालकीच्या व कंत्राटी अशा सर्व २७५ वाहनांवर आजपासून Advanced GPS प्रणाली कठोरपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. या ‘मिशन मोड’ उपक्रमामुळे मनपाच्या कामकाजात १००% पारदर्शकता येईल. इंधन चोरी, अनावश्यक फेऱ्या आणि यंत्रसामुग्रीचा गैरवापर यावर यामुळे पूर्णपणे नियंत्रण येणार असून, मनपाच्या महसुलात मोठी आर्थिक बचत होण्याचा अंदाज आहे. घंटागाड्या, पाणी टँकर्स आणि आपत्कालीन वाहनांचे रिअल टाईम ट्रॅकिंग शक्य होणार असल्याने सेवा सुधारणा आणि कंत्राटदारांवर काटेकोर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
आयुक्तांचा कठोर इशारा
आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर, नियमभंग किंवा मार्गभंग करणाऱ्या चालक, कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल.
नागरिकांसाठी सुविधा
मनपा लवकरच नागरिकांसाठी निःशुल्क मोबाइल अॅप आणि लाईव्ह ट्रॅकिंग वेबसाइट उपलब्ध करणार आहे. यामुळे नागरिक स्वतः कचरा संकलन वाहनांचे ट्रॅकिंग करू शकतील आणि सेवेची पारदर्शकता वाढेल. ही मनपाच्या डिजिटल गव्हर्नन्समधील एक मोठी झेप आहे.