
चार वर्षांपासून प्रलंबित पाणीपुरवठा समस्येला पूर्णविराम
सांगली, ४ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा): सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत गव्हर्मेंट कॉलनी (विजय कॉलनी) येथे उभारण्यात आलेल्या १५ लक्ष लीटर क्षमतेच्या अत्याधुनिक उंच जलकुंभाचे लोकार्पण आज (ता.०४) अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सुमारे १,९७,७५,८००/- (एक कोटी सत्त्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार आठशे रुपये) खर्च करून १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून बांधण्यात आलेला हा जलकुंभ परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते या जलकुंभाचे सार्वजनिक उपयोगासाठी उद्घाटन करण्यात आले.
यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेली पाणीपुरवठा समस्या आज औपचारिकरीत्या निकाली लागली आहे. या भागांना मिळणार उच्च दाबाचा पाणीपुरवठाया जलकुंभामुळे गव्हर्मेंट कॉलनी, विजय कॉलनी, गजराज कॉलनी, हसणी आश्रम परिसर आणि कुंभार मळा या भागातील नागरिकांना आता स्थिर, उच्च दाबाचा आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. तसेच, पूर्वी काही वस्त्यांमध्ये एमआयडीसीचे (MIDC) पाणी घेतले जात होते. आता नव्या टाकीमुळे हा खर्च पूर्णपणे बंद होणार असल्याने महानगरपालिकेची लक्षणीय आर्थिक बचत होणार आहे. उत्तम तांत्रिक गुणवत्तेसह प्रकल्पाची पूर्तताया प्रकल्पाचे बांधकाम मे. ए. ई. इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., ठाणे या ठेकेदार संस्थेने केले आहे. जलकुंभाला ३०० मि.मी. डीआय K–9 क्लासची मुख्य जोडणी देण्यात आली आहे, तसेच ५०० मीटर उच्च दर्जाची वितरण पाईपलाईन टाकण्यात आली आहे. संपूर्ण प्रकल्प तांत्रिक मानकांचे तंतोतंत पालन करून नियोजित वेळेत आणि उत्तम गुणवत्तेसह पूर्ण करण्यात आला आहे.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “विस्तारित भागांतील पाणीपुरवठा समस्येवर हे एक चिरंतन समाधान आहे. भविष्यात रस्ते, ड्रेनेज, पथदिवे आणि पिण्याचे पाणी यांसाठी आवश्यक निधी शासनातून मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.
“महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प नागरिकांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन मार्गी लावण्यात आला आहे. याच धर्तीवर शामनगर पाणीपुरवठा योजनाही लवकरच सोडविण्यात येईल.”आयुक्तांनी पुढील प्रशासकीय निर्धार व्यक्त केले:
पुढील ३ ते ४ महिन्यांत भूमिगत ड्रेनेज प्रकल्प (Underground Drainage Project) पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, तसेच परिसरातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा व इतर सुविधा टप्प्याटप्प्याने सुधारण्याची योजना आखली आहे.
यावेळी या लोकार्पण सोहळ्याला माजी मनपा सदस्य विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, युवराज गायकवाड, सविता मदने, अप्सरा वायदंडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मनपा प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील (सामान्य प्रशासन), कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे (पाणीपुरवठा), कार्यकारी अभियंता विनायक जाधव (विद्युत), सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल माळी, विशेष कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, अधीक्षक रविंद्र चौगुले (मालमत्ता व्यवस्थापन), अभियंते स्वप्निल कांबळे, अभय पोळ, स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी आणि पाणीपुरवठा विभागाचे सर्व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक चव्हाण यांनी केले, तर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.