मिरज पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई; म्हैसाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी

मिरज , ४ डिसेंबर (सांगली-टुडे वृत्तसेवा) : मिरज तालुक्याच्या पूर्व भागात सध्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खाली गेली असून, यामुळे पिके आणि जनावरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी आमदार सुरेश खाडे यांच्याकडे केली आहे.

फळबागा, पानमळे आणि ऊस यांसारख्या प्रमुख पिकांना पाणीटंचाईमुळे मोठा ताण जाणवत आहे, ज्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. विविध जलसाठ्यांमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्यास टंचाईवर मोठा दिलासा मिळू शकेल, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील आणि काकासाहेब धामणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मिरजचे आमदार व माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन सादर केले.

यावेळी बोलताना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु झाल्यास पिकांचे होत असलेले नुकसान टळेल आणि शेतीला मोठा आधार मिळेल. पाण्याअभावी उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतून मुक्तता मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. या प्रसंगी सलगरेचे उपसरपंच रमेश चाळके, तसेच भाजप मिरज मंडळ तालुकाध्यक्ष अभिजीत गौराजे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

        शेतकऱ्यांच्या या मागणीवर आमदार सुरेश खाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप नेहमीच अग्रेसर असून, पाणी सोडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल."

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button