
सांगली, ३० नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने मोठी आगेकूच केली आहे. समडोळी रोड येथील घनकचरा प्रकल्पस्थळी १० टन प्रतिदिन (10 TPD) क्षमतेचा बायो-मिथेनेशन प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. या ‘Waste-to-Energy’ तत्त्वावर आधारित प्रकल्पात शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आठवडा बाजारातून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर ‘अॅनएरोबिक डाइजेशन’ (Anaerobic Digestion) प्रक्रिया केली जाते.
या प्रकल्पाचे होणारे फायदे – १) ऊर्जा निर्मिती :- दररोज ४५० ते ५०० m³ बायोगॅस तयार होईल, ज्यातून वीज निर्मिती करून प्रकल्पस्थळाचा वीज-भार कमी केला जाईल. २) सेंद्रिय खत :-बायोगॅस निर्मितीनंतर उरलेला गाळ उच्च प्रतीचे, १००% सेंद्रिय खत म्हणून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्या मते, हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकास आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात घट होईल.

उपायुक्त स्मृती पाटील आणि पर्यावरण अभियंता अजित गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची तांत्रिक रचना व अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहर कचरा व्यवस्थापन, पर्यावरण आणि ऊर्जा निर्मिती या तिन्ही क्षेत्रांत आदर्श निर्माण करेल.