
मनपाचा खुलासा: रस्ते ‘दोष दायित्व’ (DLP) कालावधीत नाहीत; नागरिकांच्या खुदाईमुळेच रस्त्यांचे नुकसान
सांगली, २४ नोव्हेंबर : वार्ड क्र. १६ मधील रस्त्यांच्या दुरुस्ती कामांबाबत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले “दुबार निविदा काढल्या” अशा आशयाचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे. शहर अभियंता (बांधकाम विभाग) यांनी यासंदर्भात अधिकृत खुलासा करत वस्तुस्थिती मांडली आहे.
दुबार कामे नाहीत महानगरपालिका बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही रस्त्यावर ‘दुबार कामे’ करण्यात आलेली नाहीत. ज्या रस्त्यांसाठी निविदा काढण्यात आली आहे, ते रस्ते यापूर्वीच्या कोणत्याही निविदेत समाविष्ट करून त्यांचे काम झालेले नाही. त्यामुळे कामाची पुनरावृत्ती झाल्याचा दावा चुकीचा आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रस्ते पूर्ण झाल्यानंतर काही नागरिकांनी पाण्याच्या मेन लाईनमधून खासगी कनेक्शन घेण्यासाठी रस्त्यांची खुदाई केली. या अनधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य खुदाईमुळे रस्ते कमजोर झाले आणि खराब झाले. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक बनले.DLP कालावधी आणि नवीन निविदासदर रस्त्यांचे काम हे ‘दोष दायित्व कालावधीत’ (Defect Liability Period – DLP) नव्हते. जर रस्ते DLP मध्ये असते, तर संबंधित ठेकेदाराकडून ते मोफत दुरुस्त करून घेता आले असते. मात्र, हा कालावधी संपलेला असल्याने आणि रस्त्यांची तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याने, नियमानुसार व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच नवीन निविदा काढण्यात आली आहे.नागरिक व माध्यमांना आवाहनमहानगरपालिका प्रशासनाने नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींना आवाहन केले आहे की, कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून खात्री करावी. चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. प्रशासनाने पारदर्शकता आणि शिस्तबद्धतेवर भर दिला असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे यांनी केले आहे.