
सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार; नागरिकांचा संताप, वाहनाची केली तोडफोड; लहान मुलांसह तिघे गंभीर
सांगली, २४ नोव्हेंबर : शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रहदारीच्या मार्गावर काल रात्री ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार घडला. एका मद्यधुंद कारचालकाने विरुद्ध दिशेने गाडी चालवत समोरून येणाऱ्या वाहनांना एकापाठोपाठ धडका दिल्या. या भीषण अपघातात लहान मुलांसह ११ जण जखमी झाले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. संतापलेल्या जमावाने कारचालकाला पकडून बेदम चोप दिला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी (ता.२३) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. कारचालक संतोष झवर (वय ५१) हा आपल्या मोटारीतून भरधाव वेगात निघाला होता. तो नशेत असल्याने त्याने विरुद्ध दिशेने गाडी चालवत समोरून येणाऱ्या ४ ते ५ वाहनांना जोराची धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता की, अनेक दुचाकी आणि मोटारींचे मोठे नुकसान झाले. कारमधील एअर बॅग उघडल्याने चालक सुदैवाने बचावला.
अपघातात लहान मुले आणि वृद्ध जखमी झाल्याचे पाहून जमाव संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी वाहनधारकाच्या कारचा पाठलाग केला आणि चालकाला पकडले व चालक संतोष झवर याला चांगलाच चोप दिला आणि त्याच्या कारवर ही दगडफेक करत तोडफोड केली.
या आपघातात १२ जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे पिडाण्णा मद्रासी (५०),आयुष माने (९ – बालक), अनिता खोकरे (४०),अविनाश माने (४५), अन्वी माने (५ – बालक), नीलेश मिस्त्री (४२), रेणुका मिस्त्री (३९), स्वाती विश्वकर्मा (३९), रिद्धी पिराळे (१२ – बालक), आरती माने (२९), राजेश पिराळे (४५) व कार चालक असे जखमी झाले आहेत.
यामध्ये दोघांच्या डोक्याला मार लागला असून एका मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत जखमींना आयुष टीम व १०८ यांच्या मदतीने तातडीने सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या मद्यधुंद चालकाच्या बेजबाबदारपणामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.