सांगलीत ‘रेकॉर्ड’वरील ३०६ गुन्हेगारांची परेड; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंचा ‘सज्जड दम’

सांगली, २० नोव्हेंबर : पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी दिला रेकॉर्डवरील ३०६ गुन्हेगारांना सज्जड दम. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. १९) पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तब्बल ३०६ गुन्हेगारांची ‘झाडाझडती’ (परेड) घेण्यात आली. यावेळी “पुन्हा गुन्हा कराल तर खबरदार,” असा सज्जड दम अधीक्षकांनी गुन्हेगारांना दिला आहे. गेल्या पाच वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्र बाळगणे आणि मोकासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना या मोहिमेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये उपविभागनिहाय खालीलप्रमाणे आरोपी हजर होते:

  • जत: ७० (सर्वाधिक)
  • सांगली: ५१
  • इस्लामपूर: ५०
  • मिरज: ४७
  • विटा: ४६
  • तासगाव: ४२

पोलिस मुख्यालयात पार पडलेल्या या ‘आरोपी आदान-प्रदान’ कार्यक्रमात प्रत्येक गुन्हेगाराचा ‘इंटरोगेशन फॉर्म’ भरून घेण्यात आला. यामध्ये आरोपी सध्या काय काम करतो, त्याचे उत्पन्नाचे साधन काय, तो कोठे राहतो, त्याचे मित्र कोण आणि त्याचे जवळचे नातेवाईक कोण, तसेच त्याचा सध्याचा मोबाईल क्रमांक अशी सर्व माहिती अद्ययावत करण्यात आली. यामुळे पोलिसांकडे गुन्हेगारांचा लेटेस्ट डाटा उपलब्ध झाला आहे.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना आणि डी.बी. (गुन्हे प्रकटीकरण) पथकाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या किंवा वारंवार उपद्रव देणाऱ्या गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५, ५६, ५७ नुसार तडीपारीचे प्रस्ताव त्वरित तयार करावेत. सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) आणि मोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी. जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवावी आणि त्यांची नियमित तपासणी करावी.

या कारवाईच्या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतिश शिंदे आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button