
खटाव, १९ नोव्हेंबर : मिरजतालुक्यातील शिंदेवाडी येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय मोडल्याचे वृत्त आहे, मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. तसेच बसमधील अनेक शालेय विद्यार्थी आणि प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरज डेपोची एसटी बस मिरजकडून शिंदेवाडीमार्गे मदभावीकडे जात होती. याच वेळी शिंदेवाडीकडून आरगच्या दिशेने उसाने भरलेला एक ट्रॅक्टर येत होता. शिंदेवाडी येथील ओढ्याजवळ आल्यावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आणि अनियंत्रित झालेली एसटी बस ओढ्यात जाऊन थांबली. या आपघातात बस चालकाचे दोन्ही पाय मोडले आहेत परंतु थोडक्यात बचावले आहेत. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते, ज्यामध्ये शिंदेवाडी, लिंगनूर, खटाव आणि मदभावी येथील प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा मोठा समावेश होता. दरम्यान, खटाव येथील एक विद्यार्थिनी (जाधव) हिला मार लागल्याने व धक्क्याने जागीच बेशुद्ध पडली होती. इतर अनेक प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले.
ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम (टेप) लावून सुसाट वेगाने गाडी चालवत होता, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. गाण्यांच्या मोठ्या आवाजामुळे चालकाचे लक्ष विचलित झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. मिरज पूर्व भागात सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. अनेक ट्रॅक्टर चालक नियमांचे उल्लंघन करून, कर्कश आवाजात टेप लावून बेजबाबदारपणे वाहने चालवत असतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा बेजबाबदार ट्रॅक्टर चालकांवर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी आणि परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.