
सांगली, १९ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने शहरात सुरू केलेल्या ‘स्वच्छ रस्ते – सुरक्षित शहर’ अभियाना अंतर्गत सलग दुसऱ्या दिवशी १०० फुटीवरील अतिक्रमण निर्मूलन कारवाईला मोठे यश मिळाले आहे. मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने सदर कारवाई करण्यात आली. १०० फुटी रस्ता परिसरात रस्ते आणि पदपथ अतिक्रमणातून मुक्त करण्यात आले. वाढती वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. या कारवाईसाठी दोन स्वतंत्र विशेष पथके तैनात करण्यात आली होती.

पथक क्र. १: अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर मेडिकल ते कोल्हापूर रोड (दुसरी बाजू) या पट्ट्यात कारवाई करण्यात आली. यात ९ मोठे ‘फ्रंट मार्जिन’ पत्रा शेड आणि १६ व्यापारी पत्रा शेड्स हटविण्यात आले. विशेष म्हणजे, कारवाईचा बडगा उगारला जाताच अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले.
पथक क्र. २: उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर मेडिकल ते धामणी रस्ता या मार्गावर कारवाई झाली. यात १०x१० फुटांचे ७ मोठे व्यावसायिक गाळे, २५x२० फुटांचे अनधिकृत ओटे (कट्टे), ८ शेड्स आणि अडथळा ठरत असलेली ३ कंपाऊंड जमीनदोस्त करण्यात आले.
या धडक कारवाईमुळे १०० फुटी रस्ता आता रुंद आणि अडथळेमुक्त झाला आहे. पादचारी मार्ग (फूटपाथ) पूर्णपणे मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कारवाईत मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, अधीक्षक (अतिक्रमण) नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांचा मोठा फौजफाटा सहभागी होता.
“रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. अतिक्रमणामुळे शहराच्या विकासात बाधा येते. ही कारवाई अशीच सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.” — सत्यम गांधी, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड मनपा
या कारवाई दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्या नागरिकांनी अद्याप आपली अतिक्रमणे काढली नाहीत, त्यांच्यावर उद्या पुन्हा कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा प्रशासनाने दिला आहे.