
कुपवाड, १८ नोव्हेंबर : एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्याला कुपवाड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत ४० लिटर दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुणाल हिरा कुंभारमारवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश सुनील पाटील, (पोकॉ ३९२, एमआयडीसी कुपवाड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (ता.१८) रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कुणाल हिरा कुंभारमारवाडी (वय २४, रा. कांजारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज) हा काननवाडी गावच्या हद्दीत, पदमावती कोंबडी खाद्य गोडाऊनजवळ रोडवर बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवरून तिची वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्यावर कारवाई करत पोलिसांनी कुणाल कडून चार हजार रुपयांची गावठी हातभट्टी ४० लिटर दारू (दोन रबरच्या फुग्यांमध्ये भरलेली) व वाहतुकीसाठी वापरलेली हिरो होंडा कंपनीची चाळीस हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र. MH 10 AT 8926), असा हा एकूण ४४,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात कुणाल कुंभारमारवाडी याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, कलम ६५ (ड) आणि ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील अधिक तपास प्रभारी अधिकारी सपोनि आनंदराव घाडगे मार्गदर्शननाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील हे करत आहेत.