गजर कीर्तनाचा… कुपवाडमध्ये २० ते २२ नोव्हेंबर रोजी रंगणार भव्य कीर्तन महोत्सव

माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी मंडळाचे १३ वे वर्ष; शिवलीला पाटील, प्रकाश साठे महाराजांसह चांडाळ चौकडीचे फेम भरत शिंदे महाराजांचे कीर्तन

कुपवाड, १८ नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील अध्यात्मिक वारसा जपणारा आणि विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी ठरणारा कुपवाड येथील भव्य कीर्तन महोत्सव सोहळा येत्या २० ते २२ नोव्हेंबर या तीन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखालील शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याचे १३ वे वर्ष आहे.

कुपवाड येथील अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर हा “गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा” अनुभवण्यासाठी कुपवाडकर सज्ज झाले आहेत. गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर ते शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर या तीन दिवसांत दररोज रात्री ७.१५ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:

  • गुरुवार, दि. २० नोव्हेंबर: कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश साठे महाराज (बीड).
  • शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर: कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला पाटील (बार्शी).
  • शनिवार, दि. २२ नोव्हेंबर: चांडाळ चौकडीच्या करामती फेम ह.भ.प. भरत (बाळासाहेब) शिंदे महाराज.

या सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. रामकृष्ण पाटील आणि रामकृष्ण खाडे हे जबाबदारी सांभाळणार आहेत, तर वसंत माळकर आणि नामदेव पाटील चोपदार म्हणून उपस्थित असतील. यापूर्वी स्व. बाबामहाराज सातारकर, बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज वाडेकर यांसारख्या प्रसिद्ध कीर्तनकारांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे.

कीर्तनाचे संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीकडे सोपविण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने या महोत्सवात महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षीच्या अनुभवानुसार, यंदा सुमारे १५ हजार नागरिक या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी कुपवाड नगरीत येतील, असा विश्वास शिवप्रेमी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या कीर्तन महोत्सवाच्या जाहिरात कमान आणि व्यासपीठ उभारणी कामाचा शुभारंभ नुकताच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि श्री ग्रंथराज पारायण सोहळा समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच, कीर्तन समाप्तीच्या दिवशी, शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्यासह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष दादासो पाटील, शिवगोंडा पाटील, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, गंगाधर पाटील, राहुल कोल्हापुरे, विजय खोत, भाऊसाहेब पाटील, नितीन कारंडे, योगेश हिंगमिरे, भास्कर जमदाडे, महादेव कोरे, बापुसो तोडकर, हनमंत सरगर आदींसह सर्व सदस्य बैठकीत उपस्थित होते. कुपवाडकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या तीन दिवसीय कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक गजानन मगदुम आणि समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button