कुपवाडमध्ये पैशाच्या वादातून मित्रावरच गावठी पिस्तूलने गोळीबार; अवघ्या चार तासात संशयीत आरोपी अटक ; कुपवाड पोलिसांची दमदार कामगिरी

कुपवाड, १७ नोव्हेंबर : एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराने पैशाच्या वादातून आपल्याच मित्रावर गावठी पिस्तूलने गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी ( ता.१७) रोजी पहाटे दोन विसच्या सुमारास घडली. या घटनेत महेश उर्फ पिल्या आनंदा पारछे, (रा. सिद्धनाथ कॉलनी, भारत सूतगिरणी जवळ, कुपवाड) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कुपवाड पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या चार तासांत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली. राहुल सुभाष माने (रा. संकल्पनगर, बामनोळी, कुपवाड) आणि गणेश सदाशिव खोत (रा. शांत कॉलनी, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. या घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली असून दोघा संशयीता विरोधात कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आंनदा पारछे यांनी पोलीसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन विसच्या दरम्यान कुपवाड सुतगिरणी चौक परिसरात रेकॉर्डवरील आरोपी राहुल सुभाष माने, गणेश सदाशिव खोत आणि जखमी महेश उर्फ पिल्या आनंदा पारछे हे तिघे राहुल माने याच्या ‘महिंद्रा थार’ (एम.एच. १० ई. आर. ८२६२) गाडीतून प्रवास करत होते. यावेळी राहुल माने आणि त्याचा साथीदार गणेश खोत यांचा महेश पारछे याच्यासोबत पैशाच्या देवान घेवानितून तीव्र वाद झाला. वादातून गणेश खोत याने महेश पारछे यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. तर राहुल माने याने संतप्त होऊन महेश पारछे याच्यावर त्याच्याकडील गावठी पिस्तूलने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. ही गोळी महेश पारछे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. सदर गंभीर घटनेची माहिती कुपवाड पोलीस ठाण्यास मिळताच, प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना माहिती देण्यात आली. त्यांच्यासुचनेने सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी गुन्हे शोध पथकाच्या दोन टीम तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अवघ्या चार तासांत संशयीत आरोपी राहुल माने आणि गणेश सदाशिव खोत यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली १५,००,०००/- रुपये किंमतीची ‘महिंद्रा थार’ ही चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी आणि जखमी व्यक्ती हे तिघेही ‘रेकॉर्डवरील आरोपी’ असून त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी-मारामारी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर कारवाई कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात आणि अंमलदार संदीप पाटील, गजानन जाधव, निलेश कोळेकर, कुलदिप माने, अविनाश पाटील, प्रविण मोहिते, मधुकर सरगर, संदिप घस्ते, सुरेखा आकळे, चालक चंद्रकांत खोबरखेडे आदींनी केली. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button