
गलिच्छ शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
सांगली/बुधगांव, १४ नोव्हेंबर : रस्त्यावर गटारीआड शेजाऱ्यांनी उभे केलेल्या स्वच्छतागृहाच्या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचातीत तक्रार दिल्याचा राग मनात धरून ज्योतिबानगर बुधगावं परिसरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की आणि गलिच्छ शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. सदर घटनेची पोलिसांत तक्रार करशील तर तुला जीवे मारू अशी धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी शिवसेना पदाधिकारी श्रीकांत यशवंत यमगर (वय 35, रा. ज्योतीबानगर, बुधगाव, ता. मिरज) यांनी पोलिसांत धाव घेत संशयित महिला आणि एका पुरुषाविरोधात तक्रार नोंदवली. प्राथमिक चौकशीनंतर दोघांवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यमगर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतिबानगर बुधगाव परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने लवकरच गटरीचे काम होणार आहे. गटार होणाऱ्या जागेवरती शेजारील कुटुंबाचे स्वच्छतागृह मध्ये येते. अतिक्रमण होत असल्याने यमगर यांनी प्रशासनाकडे निर्मूलनासाठी लेखी अर्ज दिलेला होता. अर्ज दिल्याचा रागातून शेजाऱ्यांनी यमगर यांना धक्काबुक्की आणि गलिच्छ शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांत तक्रार करशील तर तुला जीवे मारू अशी धमकीही दिली. प्रकारानंतर यमगर यांनी संशयित पुरुष व महिलेवर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा नोंद केला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेणार
श्रीकांत यमगर हे शिवसेना शिंदे गट व्हीजेएनटी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहेत. प्रकारानंतर घाबरण्याऐवजी पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.