
सांगली, १४ नोव्हेंबर : सांगली-मिरज-कुपवाड शहर मनपा आयुक्त सत्यम गांधी यांनी गुरुवारी १३ नोव्हेंबर रोजी “काळी खण” परिसरात संयुक्त स्थळपाहणी करून, या महत्त्वाच्या परिसरातील सुविधा आणि स्वच्छतेत तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. नागरिकांची होणारी मोठी वर्दळ पाहून, बायोमेट्रिक गेट त्वरित कार्यान्वित करण्यासह परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. सकाळी १०.०० वाजता “काळी खण” परिसराची संयुक्त पाहणी केली. परिसराची स्वच्छता, शिस्तबद्धता आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याने आयुक्तांनी तातडीने कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. संपूर्ण परिसर अधिक प्रकाशमान व सुरक्षित होण्यासाठी माहिती फलकांवरील (बोर्डवरील) एलईडी लाईट तात्काळ कार्यान्वित करावेत. परिसराची संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी, कचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिनची संख्या वाढवावी आणि नियमितपणे औषध फवारणी करावी. आवश्यक असलेले माहिती फलक (बोर्ड) योग्य ठिकाणी लावून लोकांना माहिती उपलब्ध करून द्यावी. सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वयाने कार्य करून परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी. अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
“परिसर स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक सुरक्षेला आमच्या प्रशासनात सर्वोच्च प्राधान्य आहे. संबंधित विभागांनी नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण प्रदान करण्याची जबाबदारी पार पाडावी.”———– —-मनपा आयुक्त सत्यम गांधी ———
या पाहणीदरम्यान शहर अभियंता चव्हाण, उप अभियंता महेश मदने, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, अतिक्रमण विभाग प्रमुख नागार्जुन मद्रासी, तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.